पुण्यातील डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नांनी काेरोना रुग्ण बरी होऊन मृत्यूच्या दारातून परत

पुणे. अनपेक्षितरीत्या पुण्यात काेराेनाची लागण झालेल्या एका महिलेला तिचा पती आणि बहिणीने ‘आजार किती ही भयंकर असू दे, परंतु तू अजिबात घाबरू नकाेस, सकारात्मक विचार कर, तंदुरुस्त राहा.. तू लवकर बरी हाेशील’, असा विश्वास देत तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तर, दहा दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या या महिलेला वाचवण्यासाठी भारती हाॅस्पिटलमधील डाॅ. शिवकुमार अय्यर, डाॅ. जिग्नेश शहा, डाॅ. प्रशांत झेडगे आणि नर्स स्टाफ यांनी अथक प्रयत्न करत मृत्यूच्या दारातून रुग्णाला बाहेर काढले.


पुण्यातील ही अंगणवाडी सेविका कामानिमित्त पानशेत परिसरातील गाेरडवाडीला एसटी, जीपने प्रवास करत असतानाच एक दिवस अचानक तिची तब्येत बिघडली. त्यामुळे १४ मार्चला तिच्या पतीने तिला फॅमिली डाॅक्टरांकडे नेऊन खाेकला, दम्याची अाैषधे दिली. त्यानंतर तिला बरे वाटू लागल्याने पुन्हा ती कामावर जाऊ लागली. मात्र, पुन्हा तब्येत बिघडल्याने तिला जगताप रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी तिचा एक्स-रे काढला असता, तिला न्युमाेनिया झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात तिला अाॅक्सिजनही लावण्यात आला. मात्र, तिची तब्येत १६ मार्चला आणखी खालावल्याने भारती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णालयाने तिचे नमुने काेराेना चाचणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवले असता १९ मार्चला तिचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे विलगीकरण करून तिच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, तिच्या संपर्कातील कुटुंबातील पाच जण काेराेना पाॅझिटिव्ह निष्पन्न झाले.


सामूहिक प्रयत्नांचे यश


डाॅ. शिवकुमार अय्यर यांनी सांगितले की, तिचे नातेवाईक घाबरले हाेते आणि रुग्ण संवाद साधण्याच्या परिस्थितीत नव्हती. परंतु तिच्या नातेवाइकांना दिवसातून दाेन-तीन वेळा ‘त्यांच्यासाेबत आम्ही आहाेत’ असे सांगत मनाेबल वाढवण्याचा प्रयत्न केला. या रुग्णाची काळजी घेणारी एक टीम बनवून १२ तासांच्या पाळीने ती काम करू लागली. या रुग्णात न्युमाेनिया वगळता इतर अवयव निराेगी असल्याने व चांगली अतिदक्षता सेवा वेळच्या वेळी मिळाल्याने ती सामूहिक प्रयत्नांतून बरी हाेत गेली.


डाॅक्टर देवरूपात भेटले


या महिलेचे काेराेनाबाधित पती म्हणाले, पत्नीचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतरही आम्ही ती बरी होईल याबाबत जिद्द साेडली नव्हती. माझ्यासह माझा १७ वर्षांचा मुलगा काेराेना पाॅझिटिव्ह आला. आम्हाला नायडू रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे १३ दिवसांपासून मी पत्नीला भेटूही शकलाे नाही. मात्र, भारती हाॅस्पिटलमधील डाॅक्टर, नर्स देवरूपात आम्हाला भेटले व त्यांनी चांगल्या प्रकारे तिची काळजी घेतली. तिचा अहवाल आता निगेटिव्ह आला असून व्हेंटिलेटरवरून तिला काढण्यात आले, ही आनंदाची बाब आहे.


Popular posts
एनआव्हीत आठ तासात होणारी कोरोना चाचणी 2 तासात करणारे टेस्टिंग किट, आयसीएमआरची परवानगी
झोप उडवणारी खप्न हवीत : सोमनाथ गायकवाड नाझरा विद्यामंदिर परिवाराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डॅशबाेर्ड तंत्रज्ञानामुळे पुण्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले; राज्यात प्रथमच पुणे शहरामध्ये ठरावीक भाग सील करण्याची अंमलबजावणी
नातवाची ई-मेलवर परवानगी; पोलिसांनी चेन्नईच्या वृद्धावर केले अंत्यसंस्कार; वृद्धाजवळील सव्वा लाख कोरोना निधीसाठी
पिकांचे नुकसान : 'आधीच कोरोना, पाऊसही आवरेना...' औरंगाबाद, नाशिक, खान्देश, पुण्यात जोरदार सरी