पिकांचे नुकसान : 'आधीच कोरोना, पाऊसही आवरेना...' औरंगाबाद, नाशिक, खान्देश, पुण्यात जोरदार सरी

पुणे : कोरोनाचे संकट घोंगावत असताना बुधवारी राज्याला अवकाळी पा‌वसानेही तडाखा दिला. औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा जिल्ह्यामध्ये वीज कडकडाटांसह दुपारी व सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सोंगणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मका ही पिके आडवी झाली.नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले.


मराठवाडा : बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील शहागड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, जालना आदी तालुक्यांत पाऊस बरसला.


औरंगाबाद : जिल्ह्यातही वैजापूर, सिल्लोड, पैठण, खुलताबाद, गंगापूर, फुलंब्री, सोयगाव, कन्नड व औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला.


नाशिक : जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, मालेगाव, निफाड तालुक्यांमध्ये पावसामुळे गहू तसेच द्राक्षबागांची हानी झाली. शिर्डीतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.


खान्देश : जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसही तडाखा बसला. नवापूरमध्ये चार-पाच घरे पडली. यात एक बालिका जखमी झाली.


विदर्भ : अकोला, बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, चिखली तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बुलडाणा शहरात पोलिस अधीक्षक कार्यावरील टीनपत्रेही उडाली.


पुणे : शहर तसेच जिल्ह्यात बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांत विजांच्या कडकडाटांसह जोरदार सरी कोसळल्या. वाई, महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारांचा पाऊस झाला.गहू, ज्वारी, स्ट्रॉबेरी पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.


Popular posts
एनआव्हीत आठ तासात होणारी कोरोना चाचणी 2 तासात करणारे टेस्टिंग किट, आयसीएमआरची परवानगी
झोप उडवणारी खप्न हवीत : सोमनाथ गायकवाड नाझरा विद्यामंदिर परिवाराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डॅशबाेर्ड तंत्रज्ञानामुळे पुण्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले; राज्यात प्रथमच पुणे शहरामध्ये ठरावीक भाग सील करण्याची अंमलबजावणी
नातवाची ई-मेलवर परवानगी; पोलिसांनी चेन्नईच्या वृद्धावर केले अंत्यसंस्कार; वृद्धाजवळील सव्वा लाख कोरोना निधीसाठी